राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे एका क्लिकवर

राज्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मरकज प्रकरणी राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
पंतप्रधानांनी दिवे लावण्यापेक्षा आशेचा किरण दाखवायला हवा होता, असं राज ठाकरे म्हणाले. मोदींनी दिवे लावायला सांगण्याऐवजी लोकांना मार्गदर्शन केलं असतं, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत, याचा माहिती दिली असती तर बरं झालं असतं, असं राज ठाकरे म्हणाले.
पंतप्रधानांनी देशातील जनतेशी शुक्रवारी संवाद साधला. यावेळेस त्यांनी जनतेला दिवे पेटवण्याचे आवाहन केलं होतं.
लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा
जनतेने लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. मी समजू शकतो लोकांना अनेक प्रश्न आहेत. मला भीती आहे की, लॉकडाऊन गांभीर्याने घेतला नाही, आणि लॉकडाऊनचे दिवस वाढवले गेले, याचा संपूर्ण परिणाम उद्योगधंद्यावर होणार.
सरकारकडे कोणत्याही प्रकारचा कर येणार नाही. कर्मचाऱ्यांचे ५० टक्क्यावर पगार आणले आहेत. सरकार चालवणं देखील कठीण होईल. जितके दिवस लॉकडाऊन वाढेल तेवढे दिवस याचा परिणाम होणार. आर्थिक संकट मोठं येणार, असे राज ठाकरे म्हणाले.
यंत्रणांना दोष देऊन चालणार नाही
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी जनतेला काही खडेबोल सुनावले. लॉकडाऊनमध्ये काही जण खरंच महत्वाचं काम असल्याने घराबाहेर जातायेत. पण काही जणांकडून याचागैरफायदा घेतला जातोय. काही जण मेडिकलचे बनावट सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतायेत.
लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये अशाप्रकारचं वागणं बरं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. सर्व गोष्टीचं पाळण करणं ही समाजातील सर्वांचीच जबाबदारी आहे. फक्त यंत्रणेला दोष देऊन चालणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे
मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा. त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल करायला हवेत, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी यावेळी दिली.
धर्मबाबत बोलण्याची ही वेळ नाही. परंतु मुस्लिमांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचायलं हवं, असं राज ठाकरे म्हणाले. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी दिला.
पोलिसांवर, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजे. पोलिसांवर ‘हात उचलायची हिंमत होते कशी? पोलिसांना तुम्ही शिव्या देता? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
याबाबत मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात ठोस पावलं उचलण्याची विनंती केल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.