Jaimaharashtra news

दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी देशवासियांचा लढा अजून सुरुच आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाशी सतत दोन हात करणाऱ्या भारतीयांसाठी ही आकडेवारी नक्कीच दिलासादायक ठरेल. देशातला रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर सलग २५ व्या दिवशी तीन टक्क्यांच्याही खाली आहे. तर साप्ताहिक दर पाच टक्क्यांच्या खालीच असून स्थिर आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात ३८ हजार ९४९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ४ लाख ३० हजार ४२२ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बाधित आढळण्याचा साप्ताहिक दर सातत्याने पाच टक्क्यांच्या खालीच असून सध्या हा दर २.१४ टक्क्यांवर स्थिर आहे. तर रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर गेल्या सलग २५ दिवसांपासून तीन टक्क्यांच्या खालीच म्हणजे १.९९ टक्के इतका आहे.

गुरुवारी दिवसभरात देशातले ४० हजार २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी एक लाख ८३ हजार ८७६ वर पोहोचली आहे. तर देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९७.२८ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

देशात गुरुवारी दिवसभरात कोरोनामुळे ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता ४ लाख १२ हजार ५३१ वर पोहोचला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर आता १.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Exit mobile version