पोलिसांची काळजी घेणारा खाकीतला ‘देवमाणूस’
सामाजिक संस्थांच्या मदतीने पोलीस स्टेशनच केलं सॅनिटाईज

कोरोना विषाणूचा पादुर्भाव दरदिवसाला वाढत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी कंपन्यांनी‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुद्धा गर्दी टाळण्यासाठी अनेक कार्यालयांना सुट्टी दिलेली आहे.
परंतु अशा कठीण काळात अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. अशा परिस्थितीत पोलीस आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी पोलीस हजर असतात.
अशा परिस्थितीत पोलिसांच्या आरोग्यादेखील महत्वाचं आहे. पोलिसांची काळजी घेण्यासाठी पोलिसांनीच धाव घेतली आहे. पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी खाकीतल्याच एकाने पुढाकार घेतला आहे.
नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशचे निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने अख्खे पोलीस स्टेशनच सॅनिटाईज केलं आहे. एवढंच नाही तर हिवरे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करून दिले आहे. तसेच हे मास्क प्रत्येकाने घालूनच कामात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान राज्यातील सर्वात अत्याधुनिक पोलीस स्टेशन म्हणून लकडगंज पोलीस स्टेशचा पहिला नंबर लागतो. आता स्वच्छतेच्या बाबतीतही या पोलिस स्टेशनने सर्वाना मागे सोडत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.