Jaimaharashtra news

कोवॅक्सीन लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा भारत बायोटेकचा दावा

कोरोनावरील कोव्हॅक्सिन ही लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा केला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन लस घेतली असता वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत कोरोनाविरोधातील कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे. भारत बायोटेकने कोरोनाची लक्षणं असणाऱ्या १३० जणांची चाचणी केली आहे. गेल्या दोन आठवड्यात देशभरातील एकूण २५ ठिकाणी ही चाचणी पार पडली. भारत बायोटेकने ट्वीट करत भारताला वैज्ञानिक दृढनिश्चय, क्षमता आणि वचनबद्धतेसह जागतिक नकाशावर ठेवल्याचा आम्हाला अभिमान असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी इतर लसींच्या तुलनेत प्रतिकूल परिणामाचा दर कमी असल्याचं म्हटलं आहे.

भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार ही कोरोना लस लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी ७७.८ टक्के प्रभावी आहे. कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या रुग्णांमध्ये ही लस ६३.६ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसेच कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरियंट’विरुद्धही ही लस ६५.२ टक्के प्रभावी आढळल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Exit mobile version