Tue. Sep 28th, 2021

शिक्षकांचा पालक कोण..?

महाराष्ट्रात वाढता कोरोना….

शशांक पाटील , जय महाराष्ट्र, मुंबई : – गुर्रू ब्रह्मा, गुरू: विष्णु: गुर्रू देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म: तस्मै श्री गुरुवे नमः ।। या प्रार्थनेपासून सुरुवात होणाऱ्या शाळेतूनच मोठमोठ्या डॉक्टर-इंजिनियरपासून जनतेच्या मनावर राज्य करणारे नेते-अभिनेते घडतात आणि यांना घडवणारा शिक्षकही’. जन्माला येणारं मूल अगदी अज्ञानी असतं आणि अशा मुलाला ज्ञानी करण्याचं, घडवण्याचं काम करुन, मातीच्या गोळ्याला मडक्याचे रुप देणारा शिक्षकच सध्या संकटात सापडला आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता निर्माण असताना या लाटेचा पहिला बळी शिक्षक वर्ग होईल अशी भिती सर्वत्र दिसून येत आहे. एकीकडे दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्याच सुमारास आपल्याकडेही रुग्णसंख्या वाढत असतानाच राज्य सरकारने शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी २३ नोव्हेंबर ही तारीख नक्की केलीय. मुंबई, ठाणे, औरंगाबाद अशा काही शहरी भागात हा निर्णय स्थगित करुन ३१ डिसेंबरपर्यंत तर शिक्षणनगरी पुण्यात आणि नागपूरात १३ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे.

कोल्हापूर, नाशिकमध्येही टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास सांगितल्या आहेत. मात्र अमरावती, अकोला, नांदेड, बीड, जळगाव, धुळे, लातूर, यवतमाळ, वर्धा, सांगली, सोलापूर या सर्वच जिल्ह्यात तसेच औरंगाबादच्या ग्रामीण भागात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यात शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने शाळा सुरु झाल्या असल्या तरी त्यांना शाळेत येण्याची कोणतीही सक्ती शासनानं केलेली नाही. त्यामुळे, पाल्याचे भविष्य पालकांच्या निर्णयावर अवंलबून आहे. दुसरीकडे, शिक्षकांना मात्र शासन आदेशान्वये शाळेत जावेच लागणार आहे. म्हणूनच, शिक्षकांचा पालक कोण ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट त्यात आ वासून समोर उभी राहिलेली आर्थिक मंदी. त्यामुळे, या सर्वात प्रकृतीची पर्वा न करता अनेक शिक्षक नोकरी करण्यासाठी बाहेर पडले आहेत.

या शिक्षकांना घरी राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे शक्य असतानाही त्यांना शाळेत पाठवण्याचा आणि असे करण्यासाठी कोरोना चाचणीसाठी अनेक बाधितांच्या गर्दीत पाठवण्याचा घाट सरकार का घालत आहे? हा प्रश्न अनेक शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून शिक्षकांना वाचवण्यासाठी शासन काही उपाययोजना करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

२१ नोव्हेंबर २०२०च्या रात्रीपर्यंत जिल्हानिहाय कोरोनाबाधित शिक्षक संख्या :

सोलापूर – 178 नागपूर – 41 कोल्हापूर – 17 अकोला – 35 औरंगाबाद – 9 नाशिक – 34 नांदेड – 9 सांगली – 7 वर्धा – 24 लातूर – 3 अमरावती – 22 धुळे – 3 बीड – 20 जळगाव – 4 यवतमाळ – 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *