Mon. Dec 6th, 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट

देशातली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरु लागली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाची लाट सौम्य होताना दिसत आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नवबाधितांची संख्या घटत आहे.

देशात मंगळवारी दिवसभरात ३८ हजार ७९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २९ हजार ९४६ वर पोहोचली आहे. तर काल ४१ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या तीन कोटी १ लाख ४ हजार ७२० वर पोहोचली आहे. देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर मात्र स्थिर आहे. आजही हा दर ९७.२८ टक्के इतका आहे.

तर देशात काल दिवसभरात ६२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्या कोरोनारुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ४०८ वर पोहोचली आहे. तर देशाचा कोरोना मृत्यूदर आता १.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. देशात काल दिवसभरात ३७ लाख १४ हजार ४४१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी २३ लाख ११ हजार ५०२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १४ लाख २ हजार ९३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता ३८ कोटी ७६ लाख ९७ हजार ९३५ वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *