Friday, June 12, 2026 10:33:39 PM

Pune Crime: हृदय पिळवटून टाकणारी घटना; जन्मदात्या बापानेच केला मुलांना निर्घृणपणे संपवण्याचा प्रयत्न; चिमुकल्या हर्षदाचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगा..

जुन्नर तालुक्यात वडिलांनी दोन लहान मुलांवर हल्ला केला. साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून पाच वर्षांचा मुलगा बचावला आहे.

pune crime हृदय पिळवटून टाकणारी घटना जन्मदात्या बापानेच केला मुलांना निर्घृणपणे संपवण्याचा प्रयत्न चिमुकल्या हर्षदाचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या दोन लहान मुलांवर जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत साडेतीन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच वर्षांचा मुलगा गंभीर अवस्थेतून थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव हर्षदा सागर शिंदे असून आरोपी वडिलांचे नाव सागर सदाशिव शिंदे (वय 29, रा. मोशी) असे आहे. आरोपीने मंगळवारी सकाळी मुलांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगत घराबाहेर नेले. त्यानंतर तो पुणे-नाशिक महामार्गावरून जुन्नर तालुक्यातील आळेखिंड जंगल परिसरात गेला.

तेथे त्याने दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना निर्जन जंगलात टाकून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अमानुष घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. बुधवारी सकाळी पाच वर्षांचा मुलगा आर्यन शुद्धीवर आला आणि मोठ्याने रडत रस्त्यावर आला. त्याला पाहून परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ मदत केली आणि पोलिसांना माहिती दिली. चौकशीदरम्यान मुलाने आपले नाव तसेच मोशी येथील पत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील तपास सुरू केला.

दरम्यान, आळेफाटा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सागर शिंदे याला चाकण परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या शोध मोहिमेत साडेतीन वर्षांच्या मुलीचा, हर्षदाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत असून आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेतला जात आहे. कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा इतर कोणते कारण होते का, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

 


सम्बन्धित सामग्री