Tuesday, March 17, 2026 03:07:04 PM

Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये बुरखा परिधान करून पुरुषाचा महिलांच्या डब्यात प्रवेश; संशय येताच चालत्या ट्रेनमधून मारली उडी

घाटकोपर स्थानकादरम्यान एका विकृत पुरुषाने बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश मिळवला आणि गर्दीचा फायदा घेत महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली.

mumbai local  मुंबई लोकलमध्ये बुरखा परिधान करून पुरुषाचा महिलांच्या डब्यात प्रवेश संशय येताच चालत्या ट्रेनमधून मारली उडी

Mumbai Local : मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घाटकोपर स्थानकादरम्यान एका विकृत पुरुषाने बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश मिळवला आणि गर्दीचा फायदा घेत महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. प्रवाशांना संशय येताच या बुरखाधारी नराधमाने फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला.

असा उघड झाला बुरख्यामागचा चेहरा
CSMT कडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही खळबळजनक घटना घडली. संबंधित आरोपीने बुरखा घातलेला असल्याने सुरुवातीला तो पुरुष असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, डब्यातील महिलांना मुद्दाम स्पर्श करण्याच्या त्याच्या हालचालींमुळे काही महिला प्रवाशांना संशय आला. महिलांनी त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली आणि काहीजणींनी या प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. आपण पकडले जाणार हे लक्षात येताच, ट्रेन घाटकोपर स्थानकात शिरण्यापूर्वीच त्याने रुळावर उडी घेतली आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या विरुद्ध दिशेच्या कर्जत फास्ट लोकलमध्ये चढून तो पसार झाला.

हेही वाचा -  Mumbai Crime : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कफ परेडमध्ये मूकबधिर तरुणीवर नराधम पित्याकडून अत्याचार

रेल्वे पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र
या घटनेनंतर महिलांनी तातडीने रेल्वे पोलिसांशी (GRP/RPF) संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर तपास केला, मात्र तोपर्यंत आरोपी निसटला होता. घाटकोपर आरपीएफने रेल्वे कायद्याच्या कलम 162 नुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. दिवसाढवळ्या पुरुष बुरखा घालून महिलांच्या राखीव डब्यात शिरतात आणि अश्लील चाळे करून पळून जातात, यामुळे रेल्वे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री