Bhaskar Jadhav Son: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात स्थानिकांना रोजगार देण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवा जिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या संदर्भात काते यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओमध्ये विक्रांत जाधव सदृश्य व्यक्ती “माझं काम थांबवलं का?” असा प्रश्न विचारताना दिसत आहे, तर समोरील व्यक्ती “आम्ही तुमचं नाही, कंपनीचं काम थांबवलं” असे सांगताना दिसते. या संवादानंतरच परिस्थिती बिघडली आणि वाद सुरू झाला.
नेमकं काय घडलं ?
फिर्यादी सचिन सुधीर काते (वय 40, रा. लोटेमाळ, खेड) हे गेली दहा वर्षे लोटे एमआयडीसीमधील विविध कंपन्यांना कामगार पुरवण्याचे काम करत आहेत. तसेच 2021 पासून ते लोटे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. 6 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारास विजय केमिकल कंपनीच्या मॅनेजरकडून बोलावणे आल्याची माहिती मिळताच काते आणि त्यांचे दोन सहकारी कंपनीच्या गेटवर पोहोचले. काही वेळ चर्चेनंतर त्यांना आत बोलावण्यात आले. कंपनीच्या परिसरात प्रवेश केल्यावर तिथे विक्रांत भास्कर जाधव (रा. चिपळूण), सुमित शिंदे (रा. धसपटी), विवेक आंब्रे (रा. आवाशी) आणि सुमारे 7 ते 8 अनोळखी कामगार उपस्थित होते. स्थानिकांना कामावर घेण्याबाबत चर्चा सुरू असतानाच वातावरण तापले. “तुम्ही स्थानिक म्हणजे काय?” असा सवाल करत विक्रांत जाधव यांनी वादाला सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हेही वाचा - Sheetal Tejwani: पार्थ पवारांच्या कंपनीचा संबंध उघड, ‘शीतल तेजवानी’ ठरली व्यवहारातील सूत्रधार!
मारहाण आणि जीव घेण्याची धमकी
वाद वाढल्यानंतर विक्रांत जाधव यांनी हाताने मारहाण केली तसेच “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. यावेळी सोबत असलेले सुमित शिंदे, विवेक आंब्रे आणि इतर काही कामगारांनीही जमाव जमवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. या घटनेनंतर सचिन काते यांनी खेड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी विक्रांत जाधव, सुमित शिंदे, विवेक आंब्रे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189(1), 189(2), 190, 191(2), 115(2), 351(3), 352 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा - Parth Pawar: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात नवा खुलासा; मामेभावावर गुन्हा दाखल, भागीदार असूनही पार्थ पवारांचं नाव वगळलं
राजकीय वर्तुळात खळबळ
उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असल्याने या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील दोन पदाधिकाऱ्यांमधील वाद पोलिसांपर्यंत गेल्याने पक्षातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास खेड पोलीस निरीक्षक करत आहेत.