पूर्णा पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यास मारहाण, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पूर्णा पाटबंधारे कार्यालयाजवळ कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांना काही अज्ञात आरोपींनी अडवून मारहाण केली. आरोपींनी त्यांना निविदा प्रक्रिया डावलून काम देण्याची मागणी केली आणि पाच लाख रुपये देण्यास सांगितले. तसेच, "माझ्या माहितीच्या अधिकाराचा निकाल का काढला?" असा प्रश्न विचारत जबरदस्तीने त्यांच्यावर हात उचलला. थापड-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेमुळे पूर्णा पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप उसळला आहे. त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत काम बंद आंदोलन पुकारले आहे. संबंधित प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
👉👉 हे देखील वाचा : मुस्लिम विद्यार्थ्यांचा बुरख्यावरून संताप: "आम्ही कॉपीसाठी नाही, सुरक्षेसाठी बुरखा घालतो!"
कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात एका तक्रारदाराने कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत कैलास निकाळजे यांच्या नावाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या घटनेने नवे वळण घेतले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
या हल्ल्यामुळे वसमत तालुक्यातील पूर्णा पाटबंधारे विभागाचा कामकाज विस्कळीत झाले आहे. कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद ठेवत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे. तसेच, वसमत तालुक्यातील शेतीसाठी दिले जाणारे पाणी सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.