जळगाव: जळगावच्या पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर शुक्रवारी अक्षरशः रणभूमी बनला. भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने तब्बल 12 राउंड गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत तरुणाचे नाव आकाश कैलास मोरे (वय 26, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे असून, घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याचे शरीर अक्षरशः चाळणीसारखे झाले.
आकाशने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडिया बनवलेली रील ठरली हत्येचे कारण?
हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तो म्हणतो 'शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोख ठोक. जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर काहीच तासांत हा जीवघेणा हल्ला झाल्याने, त्यात ‘दादागिरी’चा सूर होता का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा: Raj-Uddhav Thackeray Victory Rally: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर; विजयी मेळावा की नवीन राजकीय युतीचा श्रीगणेशा?
गोळीबाराची भयावहता, डोक्यावर, छातीवर, पाठीवर तब्बल 12 गोळ्या
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात आकाशच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या. कपाळावर 1, डोक्यावर 4, पाठीवर 4, छातीवर 1, डोक्याच्या मागे 2 अशा एकूण 12 राउंड फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. आकाशवर तब्बल 12 गोळ्या झाडण्यात आल्यामुळे त्याच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली होती.
आरोपींचा थरकाप आणि आत्मसमर्पण
हत्यानंतर मारेकरी नीलेश अनिल सोनवणे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून निघाले. मात्र, त्यांच्यामागे काही लोक असल्याची शंका त्यांना आल्याने आणि कदाचित स्वतःच्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाल्याने ते थेट जामनेर पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले. शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास ते म्हसावद-नेरी मार्गे पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले. त्यावेळी ते घाबरलेल्या अवस्थेत होते आणि पोलिस स्टेशन कुठे आहे, अशी विचारणा करत उभे होते. अखेर त्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
वाळू व्यवसायाचा वाद की वैयक्तिक वाद?
या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद, वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सोशल मीडियावरच्या स्टेटस, रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना यांचाही तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल डिटेल्स व सोशल मीडिया पोस्ट यावर सखोल तपास केला जात आहे. पाचोरा शहरात या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.