बीड : बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात आज आणखी एका मातेचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. आज मृत्यू झालेल्या महिलेचे नाव रुक्मिणी परशुराम टोने आहे. 13 एप्रिल रोजी सकाळी रुक्मिणी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सिझेरियन (सी- सेक्शन डिलिव्हरी) झाले. यादरम्यान त्यांनी 2 किलो 300 ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. रुक्मिणी यांची चौथी प्रसूती होती. त्यांच्यावर आयसीयु विभागात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुक्मिणी यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगण्यात आले होते. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रेफरचा सल्लाही देण्यात आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यावर 'रेफर' (Refer) चा सल्ला म्हणजे एका डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे किंवा तज्ञांकडे (specialist) रूग्ण पाठवण्याची शिफारस करणे होय. विशेषतः ज्या रूग्णाला विशिष्ट प्रकारचा उपचार किंवा तपासणी आवश्यक आहे, तो उपचार किंवा तपासणी उपलब्ध असलेल्या तज्ञांकडे पाठवण्यासाठी रेफर केला जातो.
हेही वाचा : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर; निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंचा खळबळजनक दावा
रविवारी बीडमध्ये एका गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी डॉक्टरांनी पैशांची मागणी केली होती. त्यावेळी तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून दोन हजार रुपये देखील घेतले. मात्र इतकं सगळं करूनही त्यांनी आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत असा आरोपही महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप केला होता. गर्भवती महिलेची नॉर्मल प्रसूती झाली आणि त्यानंतर गर्भवती महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना सांगितले असता त्यांनी उद्धटपणे उत्तर दिले. त्यानंतर डॉक्टरांनी रक्ताची पिशवी मागितली. या सगळ्यात खूप वेळ गेला. दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही बीडमधील गर्भवती महिला मृत्यूची पहिली घटना होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.