Pune Crime : पुण्याजवळील म्हाळुंगे (ता. मुळशी) परिसरात भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका भीषण हत्याकांडात झाले आहे. दत्ता काळुराम जगताप (30) याने रागाच्या भरात आपली पत्नी कुसुम वसंत पवार (32) हिची काठीने मारहाण करून आणि डोक्यात दगड घालून हत्या केली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी, 17 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. आरोपी दत्ता हा मृत महिलेच्या पहिल्या पतीचा सख्खा भाऊ असून, पतीच्या निधनानंतर कुसुम त्याच्यासोबत संसार थाटून राहत होती. याप्रकरणी बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. मृत कुसुमला पहिल्या पतीपासून 3 मुले असून आता ही मुले उघड्यावर पडली आहेत.
पैशांचा वाद आणि क्रूर मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम आणि दत्ता हे दोघेही भंगार जमा करणे आणि मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत होते. जमा केलेल्या भंगारातून आलेल्या पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. वादाचे स्वरूप इतके वाढले की, दत्ताने कुसुमला अमानुषपणे मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने काठीने तिच्या डोक्यावर, मानेवर आणि पोटावर गंभीर वार केले. कुसुम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळलेली असतानाही आरोपीचा राग शांत झाला नाही; त्याने जवळील एक मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - Mumbai Crime : अंधेरीत सोसायटीवर अंदाधुंद गोळीबार; आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल
साक्षीदारावरही हल्ला; पोलिसांकडून तपास सुरू
हे भीषण भांडण सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या दत्ताने त्या महिलेवरही काठीने हल्ला केला, ज्यामध्ये तिच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बावधन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दत्ता जगतापला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने एका महिलेचा बळी गेला असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
हेही वाचा - Mangesh Kalokhe Death Case: मंगेश काळोखे मृत्यू प्रकरणाबाबत मोठी अपडेट; 23 दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळणारा राष्ट्रवादीचा प्रवक्ता अखेर अटकेत