Beed Crime: मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवारी केज सत्र न्यायालयात या खळबळजनक प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली असताना संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या जबाबात एक धक्कादायक माहिती समोर आली.
हत्येच्या एक दिवस आधीच संतोष देशमुख यांनी पत्नी अश्विनी याना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं-'वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील.'या जबाबाने कोर्टात एकच खळबळ उडवून दिली. दिनांक 7 आणि 8 डिसेंबर रोजी पती- पत्नीमध्ये यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली होती, असा खुलासा अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात केला.
वाल्मिक कराडचा साथीदार विष्णू चाटे याने संतोष देशमुखांना थेट धमकी दिली होती. या संभाषणात त्याने स्पष्ट शब्दांत म्हटलं होतं –'तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही.
हा फोन आल्यानंतर संतोष देशमुख प्रचंड तणावात होते त्यांनी ही माहिती पत्नीला सांगितली होती. तणावग्रस्त संतोष देशमुख यांना पत्नीने धीर दिला, मात्र त्यांचे मन भितीने ग्रासले होते.धमकीमुळे अस्वस्थ झालेल्या संतोष देशमुखांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं –'तुला माहिती नाही, तो वाल्मिक कराड गुंड आहे. त्याची राजकीय नेत्यांशी उठबस आहे. ते लोक मला नक्कीच संपवतील.हे शेवटचं संभाषणच भयावह भविष्यवाणी ठरलं. पत्नीने त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला, मात्र त्याआधीच त्यांचा निघृण खून करण्यात आला.
या धक्कादायक खुलास्यानंतर केज सत्र न्यायालयात पुढील सुनावणीसाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. हत्येपूर्वीच्या या धमकीचा आणि गुन्ह्याचा नेमका संबंध काय? वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा या प्रकरणात किती हात आहे? याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.