थायलंड फिरायला गेले, जर्मन तरुणीवर केला बलात्कार, साताऱ्यातील २ तरुण अटकेत
थायलंडमधील एका जर्मन तरुणीवर बलात्कार प्रकरणात साताऱ्यातील दोन व्यक्तींचा सहभाग उघड झालं आहे. यामुळं महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. विजय घोरपडे ( वय 47) आणि राहुल भोईटे ( वय 40) या दोघांवर थायलंड पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात डांबलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर साताऱ्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
थायलंडच्या रिन बीचवर १४ मार्च रोजी 'फुल मून पार्टी'चं आयोजन करतण्यात आलं होतं. याठिकाणी २४ वर्षीय जर्मन तरुणी तिच्या मित्रासोबत आली होती. पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांनी या तरुणीला बीचवरील एका खडकावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. गुन्हा करून हे दोघे कोह फांगन जिल्ह्यातील एका बंगल्यात निघून गेले.
हेही वाचा - Australian Woman Molestation Case: मुंबईत ऑस्ट्रेलियन नौदलातील महिलेचा विनयभंग; आरोपी ड्रायव्हरला अटक
या घटनेची माहिती मिळताच कोह फांगन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं दोन्ही आरोपींची ओळख पटली आणि १५ मार्च रोजी पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पण पीडित तरुणी अजूनही शुद्धीवर नसल्यानं ओळख पटवणं शक्य झालं नाही. तेव्हा १६ मार्चला तरुणीनं आरोपींना ओळखल्यानंतर विजय घोरपडे यानं आपला गुन्हा कबूल केला. तर राहुल भोईटेने आरोप फेटाळून लावत केवळ चुंबन घेतल्याचा दावा केला. पण पोलिसांनी दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा - नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर रिक्षामध्ये अत्याचार
ही घटना समोर आल्यानंतर साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर नागरिक आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. साताऱ्यातील काही सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली घालायला लावली आहे. अशा प्रवृत्तींचा कडक बंदोबस्त करायला हवा, असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, थायलंडमध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा केली आहे. दोषी सिद्ध झाल्यास दोघांनाही २० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.