पुणे: स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. आरोपीच्या वकिलांनी 7500 रुपये दिल्याचा दावा फेटाळला आहे.
सुरुवातीला आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधताना पीडितेला 7500 रुपये देण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र, आजच्या सुनावणीनंतर वकील सुमित पोटे यांनी असा कोणताही मुद्दा न्यायालयात मांडला नसल्याचे सांगितले. हा तपशील आरोपीने नंतर उघड केला आणि त्यावर आधारित माहिती माध्यमांना देण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात आरोपीने कोणतीही जबरदस्ती केली नसून, घडलेली घटना परस्पर संमतीनेच घडल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, त्या वेळी पीडित तरुणीसोबत एक एजंटही उपस्थित होता, असे वकिलांनी पूर्वी सांगितले होते. मात्र, आता या संपूर्ण दाव्यांवरून त्यांनी माघार घेतल्याने प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचे झाले आहे.या विसंगत वक्तव्यांमुळे आरोपीच्या वकिलांवर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या विधानांबाबत पोलिसांकडून काय कारवाई केली जाईल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतू स्वारगेट बसमध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सरकारनेही तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.