Monday, June 23, 2025 12:08:03 PM

आचोळ्यात प्रेमवीराला अटक; गर्लफ्रेंडसाठी चोरल्या तब्बल सात रिक्षा

वसईतील प्रेमवीराने गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी तब्बल 7 रिक्षा, 1 स्कूटर चोरली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली प्रेमासाठी दिली आहे.

आचोळ्यात प्रेमवीराला अटक गर्लफ्रेंडसाठी चोरल्या तब्बल सात रिक्षा

वसई: प्रेमासाठी लोक काय करतील, याचा काही नेम नाही. पण वसईतील आचोळे परिसरात एक तरुण आपल्या प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी थेट गुन्हेगारीच्या मार्गावर उतरल्याचं समोर आलं आहे. आचोळे पोलिसांनी एका अशाच प्रेमवीराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून तब्बल सात रिक्षा, एक स्कूटर आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या चोरट्याने ही सर्व चोरी आपल्या प्रेयसीसाठी केली होती, अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.

शशिकांत मलेश कामनोर (वय 24) असं या आरोपीचं नाव आहे. शशिकांत मुंबईतून रिक्षा चोरायचा आणि त्यावर प्रवासी भरून भाडं कमवायचा. जेव्हा रिक्षाचं पेट्रोल किंवा सीएनजी संपायचं, तेव्हा तो ती रिक्षा त्या जागेवरच सोडून देत असायचा. त्या पैसे वापरून तो आपल्या गर्लफ्रेंडचे हट्ट पूर्ण करत असे. या सर्व गुन्ह्यांचं मूळ कारण म्हणजे त्याचं प्रेम, आणि त्यात तो इतका गुंतला की कायदेशीर मर्यादा तोडून बसला.

हेही वाचा: भावासाठी ट्विट केलं, पण नंतर डिलीट केलं? निलेश राणे म्हणाले, 'त्याने मला अधिकार...

शशिकांतची गर्लफ्रेंड आचोळे परिसरात राहत असल्याने तो चोरी केलेल्या रिक्षा आचोळेत आणून उभ्या करत असे. या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांच्या संशयाला वाव मिळाला आणि शेवटी आचोळे पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने हे सर्व गुन्हे प्रेमासाठी केल्याचं कबूल केलं.

शशिकांतविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात आचोळे पोलीस ठाणे 2 गुन्हे, विरार पोलीस ठाणे 1, देवनार 1, अंधेरी 1, बांद्रा 2 आणि एम एच बी पोलीस ठाण्यात 1 अशा एकूण 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Ganja racket exposed: दक्षिण महाराष्ट्रातील गांजाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी सांगितले की, 'हा आरोपी रिक्षा चोरी करत असे, पण विक्री करत नसे. त्याऐवजी त्या रिक्षांचा उपसा करून तो आपल्या गर्लफ्रेंडच्या मागे पैसे खर्च करत होता. त्याच्या या अनोख्या प्रेमकथेने सर्व पोलिस दलाला थक्क केलं आहे.'

हे प्रकरण म्हणजे गुन्हेगारी आणि प्रेम यामधील सीमारेषा किती पुसट होऊ शकते याचं जिवंत उदाहरण आहे. प्रेम हे माणसाला प्रेरणा देऊ शकतं, पण जर ते अती झालं तर अशा प्रकारची गुन्हेगारीसुद्धा उद्भवू शकते, याचा धक्का देणारा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला असून, आरोपीकडून आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री