Mon. May 10th, 2021

CSMT Bridge Collapse: स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची हकालपट्टी

मुंबईत गेल्या वर्षभरातील 3 पूल दुर्घटनांबाबत संगळीकडून संताप व्यक्त होत आहे.

अशा दुर्घटनांसाठी जबाबदार कोण, असा सवाल सर्वत्र विचारला जात असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

हिमालय पादचारी पूल दुर्घटनेची 24 तासांच्या आत चौकशी करून पालिका अधिकारी, ठेकेदार, स्ट्रक्चरल ऑडिटर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

तर हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची शासकीय पॅनलवरून हकालपट्टी करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मात्र या दुर्घटनेने मुंबईतील सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे सर्व पुलांची फेरतपासणी होणार आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला जोडणारा हिमालय हा पादचारी गुरुवारी संध्याकाळी पूल कोसळला.

या दुर्घटनेत 6 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले.

सुरक्षित जाहीर करण्यात आलेला पूल कोसळल्यामुळे सर्वत्र संताप व असुरक्षिततेची भावना पसरली आहे.

याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळपर्यंत या दुर्घटनेला जबाबदार कोण, हे ठरविण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त (दक्षता) विवेक मोरे यांना चौकशीचे आदेश दिले होते.

या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल मोरे यांनी आज संध्यकाळी आयुक्तांकडे सादर केला.

त्यानंतर आयुक्तांनी तत्काळ कारवाई करीत या पुलाच्या ऑडिटचे देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन, कार्यकारी अभियंत्याची खातेनिहाय चौकशी, पूल विभागाच्या सेवानिवृत्त दोन अधिकाऱ्यांची चौकशी आणि ठेकेदार व स्ट्रक्चरल ऑडिटर यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *