Jaimaharashtra news

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच

पुणे – कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच होणार आहे. पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडीत सलग दुसऱ्या वर्षी मांडव न उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दहा दिवस मंडळाचे विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत. यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं १२९ वे वर्ष आहे.

नियमांप्रमाणे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.हार, फुले, पेढे नारळ स्वीकारले जाणार नाहीत. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर

ऑगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, याकरिता या तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता ट्रस्टतर्फे एक लिंक देण्यात येणार असून त्या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडीओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात श्रींची आरती करतानाचा व्हिडीओ तयार होणार आहे. आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करत असल्याचा आनंद व्हिडीओ पाहून भक्तांना घेता येईल.

Exit mobile version