वडिलांच्या मालमत्तेवर मुलीला समान अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. वडिलांच्या मालमत्तेवर मुलीला समान अधिकार असणार असल्याचा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तीचा विना मृत्यूपत्र मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर त्यांच्या मुलीचा अधिकार असणार असल्याचे, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हिंदू उत्तराधिकार कायदा वडिलांच्या मालमत्तेवर मुलींना समान अधिकार देतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधितप्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न बनविताच झाला असेल तसेच ती मालमत्ता त्याने स्वतः कमवलेली किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे कायदेशीर वारसांमध्ये विभाजन होते.