Mon. Jul 13th, 2020

Whatsapp चा प्रताप, जीवंत होण्याच्या अपेक्षेने मृतदेह मिठात!

सोशल मीडियावर माहितीचा महापूर आलेला असतो. Whatsapp वर फिरत असणाऱ्या मेसेजेसवर देखील डोले बंद करून लोक विश्वास ठेवत असतात. मात्र यातले सगळेच मेसेजेस खरे असतात असं नव्हे. याचा अनुभव शुक्रवारी जळगावकरांना आला.

Whatsapp वर आलेल्या संदेशानुसार चक्क बुडून मृत झालेली दोन्ही मुलं जिवंत होतील या आशेने त्यांना  जळगाव च्या शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात चार तास दीड क्विंटल मिठात ठेवण्यात आल्याची घटना घडली.

काय घडलं नेमकं?

जळगाव शहरातील मेहरूण तलावात अक्सानगरातील उमेर जकी अहमद आणि अबुलैस जकी अहमद अनुक्रमे बारा आणि सोळा वर्ष वयोगटाची ही दोन बालकं काल बुडाली.

त्यानंतर त्यांचे मृतदेह हे जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालय शवगृहात ठेवण्यात आली.

नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.

दरम्यान एका व्यक्तीने Whatsapp वरील संदेश दाखवत विचित्र प्रयोग करण्याचा प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावाला अनुसरून मुलं जीवंत होतील, या अपेक्षेने शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात चार तास दीड क्विंटल मिठात त्यांना ठेवण्यात आलं.

मात्र, हा प्रयोग यशस्वी ठरू शकला नाही.

शासकीय रुग्णालयात असा प्रकार घडल्याने मोठी खळबळ माजली.

रुग्णालय प्रशासनाने मात्र यासंदर्भात कोणते उत्तर देण्यास नकार दिला आहे.

शवविच्छेदनासाठी आलेल्या मृतदेहाला चार तास मिठामध्ये ठेवणे कितपत योग्य आहे यावर सुद्धा मोठी चर्चा होताना दिसत आहे.

काय होता Whatsapp वरील तो मेसेज?

जर कधी कुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि त्याचं शरीर 3 ते 4 तासांत मिळालं तर त्याचे प्राण परत मिळवता येऊ शकतात.

जर कधी कुणाला अशी दुर्घटना दिसली किंवा ऐकू आली तर आम्हाला तात्काळ कळवा, असा आशयाचा संदेश Whatsapp वर फिरत होता.

या संदेशात मोबाईल नंबर्स देऊन ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकेल आणि जीवन धन्य होईल.

याची प्रक्रियादेखील देण्यात आली होती.

दीड क्विंटल मीठ बेडसारखे पसरवून त्यावर कपडे काढून झोपवा.

मीठ हळूहळू पाणी खेचून घेईल.

रुग्ण शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालयात घेऊन जावे.

यापूर्वी रुग्णालयात घेऊन गेले असाल, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यास तुम्ही हा मिठाचा उपचार करा.

ईश्वराच्या कृपेने आनंदाची लहर पसरेल.

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर अंत्यसंस्कार करण्याची घाई करू नये.

लवकरात लवकर मिठाचा प्रयोग करावा.

बुडालेल्या व्यक्तीला जेवढा कमी वेळ झाला असेल, तेवढा त्वरित शुध्दीवर येण्याची शक्यता असते.

मात्र या सगळ्या प्रकारामध्ये व्हाट्सअप संदेशाने माणसाच्या जीवनात ढवळाढवळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *