Jaimaharashtra news

छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे 24 मार्च रोजी मृत्युंजय अमावस्येला महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोहळा रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीने घेतला आहे.

सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी शासनाने घेतलेले निर्णयाचे राज्याबाहेर आणि राज्यातही पालन केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्याच्या काना-कोपऱ्यातून लाखो शंभु भक्त वढू बुद्रूक येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. येत्या 24 मार्चला मृत्युंजय अमावस्येला होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त वढू ग्रामस्थ यांच्या एकविचाराने येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी सहकार्य करावे आणि सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा असं शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितलं.

जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवलं. त्यामुळे त्यांचा बलिदान सोहळा रद्द झाल्याने शंभूप्रेमीमध्ये नाराजी असली तरी या निर्णयाचं स्वागत करत प्रशासनाच्या निर्णयाला सर्वांनी साथ द्यावी असं म्हणाले आहेत.

Exit mobile version