पेंचमधील कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू

कॉलरवाली नावाने प्रसिद्ध आणि २९ बछड्यांना जन्म देणारी पेंच व्याघ प्रकल्पातील वाघिणीचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रविवारी कर्मझारीच्या बेस कॅम्पमध्ये या वाघिणीचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
टी-१५ या नावाने ओळखणाऱ्या १७ वर्षीय वाघिणीचा शनिवारी मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. २००८ ते २०१८ या ११ वर्षांच्या काळात या वाघिणीने २९ बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम केला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या वाघिणीच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी, तिच्या मृत्यूचे तपशील मात्र देण्यात आले नाही. १४ जानेवारी रोजी पर्यटकांना या वाघिणीचे शेवटचे दर्शन झाले होते. वाघांचे सरासरी आयुष्य हे १२ वर्ष इतके असते, मात्र या कॉलरवाली वाघिणीचा १७व्या वर्षी मृत्यू झाला आहे.