Mon. Aug 8th, 2022

‘अतिवृष्टी भागात ओला दुष्काळ जाहीर करा’

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं आणि बियाणे वाहून गेले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजितदादांनी केली आहे.

एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत ३० जून रोजी सरकार स्थापन केले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन २५ दिवस उलटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेले नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे एकूण ८ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. हे सर्व शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सोयाबीन, कापूस, भाजपीला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील २ लाख ९७ लाख हेक्टरवरील सोयाबीन आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात अडीच लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या भागांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सगळ्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार, याची वाट शेतकरी पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.