Fri. Aug 12th, 2022

‘सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा नाही’

नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, पीक विमा, चक्रीवादळाने झालेलं नुकसान यांसह महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या वैयक्तिक भेटीची माहिती दिली. ‘सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. याआधी बराच काळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे पंतप्रधानांसोबत आमची व्यक्तिगत भेट झाली. या भेटीत वावगं काहीच नाही. मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

या भेटीत मराठा आरक्षणापासून ते अगदी मुंबई मेट्रोसाठी कांजूरमार्गची जागा, जीएसटीचा परतावा, पिक विमा, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरची मदत अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भेटीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी भेटीचा तपशील माध्यमांसमोर मांडला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात या नेत्यांची विशेष पत्रकार परिषद पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.