Sun. Sep 19th, 2021

जूहीला २० लाखांचा दंड

अभिनेत्री जुही चावला हिने ‘५-जी’ नेटवर्कच्या नेटवर्कच्या अखंड किरणोत्साराने निसर्गावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत तिने दिल्ली उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं जुही चावलाची याचिका फेटाळली आहे. इतकंच नाही तर तिला तब्बल २० लाखांचा दंडही सुनावला आहे.

जुहीबरोबर पर्यावरणवादी कार्यकर्ते वीरेश मलिक आणि टीना वाच्छानी यांनी मिळून ‘फाइव्ह जी’ला आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती. मोबाइल कंपन्यांनी ‘५-जी’ तंत्रज्ञान कार्यान्वित केल्यास सर्व व्यक्तींना, वनस्पतींना ‘आरएफ’ किरणोत्साराचा त्रास सहन करावा लागेल, असं या याचिकेत म्हटलं होतं.

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचा चुकीचा वापर केल्याचं सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना २० लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे. ‘५- जी’ तंत्रज्ञानाविषयी सरकारकडे काहीही आक्षेप न नोंदवता थेट याचिका कशी दाखल केली, अशी विचारणासुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावला हिला बुधवारी केली.

‘आपल्या हक्कांबाबत तुम्ही आधी सरकारकडे दाद मागायला हवी होती. तेथे न्याय न मिळाल्यास न्यायलयात यायला हवे होते,’ असे न्यायाधीश मिधा यांनी सुनावणीवेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *