Fri. Aug 12th, 2022

राज्यसभा निवडणुकीत अपक्षांवर भिस्त

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानावर महाराष्ट्रातील मोठी सत्तासमीरणं अवलंबून आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी कंबर कसली आहे. अपक्षांनी निवडणुकीत मदत करावी असे प्रयत्न मविआ आणि भाजपकडून सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार की विरोधी पक्ष भाजपचा? याची उत्सुकता आहे.

भाजप :

भाजपकडे स्वतःची १०६ मते आहेत. त्यांना राजू पाटील (मनसे), रत्नाकर गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), विनय कोरे (जनसुराज्य), रवी राणा, प्रकाश आवाडे, महेश बालदी, राजेंद्र राऊत (चौघे अपक्ष) या सात आमदारांचा पाठिंबा आहे. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांची पार्श्वभूमी संघाची असल्याने त्यांचा पाठिंबाही भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अग्रवाल यांनी संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सही दिल्याने त्यांचे मत नक्की कुणाला जाणार, याबाबत साशंकता आहे.

शिवसेना :

शिवसेना आमदारांची संख्या ५६ असून, अंधेरीचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ती ५५ झाली आहे. शिवसेनेला नऊ आमदारांचा पाठिंबा आहे. यात मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल, बच्चू कडू, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील यड्रावकर, नरेंद्र भोंडेकर आणि गीता जैन या आमदारांचा समावेश आहे.

काँग्रेस :

काँग्रेसचे ४४ आमदार असून त्यांना बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील (बोईसर), क्षितीज पाटील (नालासोपारा), हितेंद्र ठाकूर (वसई) या तीन आमदारांचा पाठिंबा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. मात्र या तिन्ही आमदारांवर देवेंद्र फडणवीस यांचाच प्रभाव असेल, असे बोलले जाते. त्यामुळे या तिघांची मते महाविकास आघाडीचे नेते गृहित धरत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस :

राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार असून, त्यातील अनिल देशमुख व नवाब मलिक हे ‘ईडी’च्या आरोपांमुळे तुरुंगात आहेत. तसेच त्यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने त्यांची मते सोडून राष्ट्रवादीची संख्या ५१ होते. त्यांना सहा आमदारांचा पाठिंबा असून त्यात देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष), संजय शिंदे, किशोर जोरगेवार (दोघे अपक्ष), शामसुंदर शिंदे (शेकाप), रईस शेख, अबू आझमी (दोघे समाजवादी पक्ष) यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडी :

तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला असल्यामुळे महाविकास आघाडीकडे विनोद भिवा निकोले यांचेही मत आहे. महाविकास आघाडीचे एकूण आमदार आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १७१ होते. मात्र यातील नवाब मलिक, अनिल देशमुख यांना आता मतदानाला येणे शक्य नसल्यामुळे ते दोन आणि हितेंद्र ठाकूर यांची तीन मते वजा केल्यास हा आकडा १६६ होतो. तर विनोद अग्रवाल यांच्यासह भाजप व त्यांच्या समर्थकांची संख्या ११४ होते. यात बहुजन विकास आघाडीची मते मिळवली तर ही संख्या ११७ वर जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.