Thu. May 6th, 2021

‘महाराष्ट्रात ‘लॉक’शाही सुरू आहे’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतत होत असलेल्या टाळेबंदीवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रात लोकशाही आहे असं म्हटलं जायचं. पण आता महाराष्ट्रात ‘लॉक’शाही सुरू आहे,’ असा सणसणीत टोला फडणवीस यांनी सरकारला हाणला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोरोना काळातील कारभारावर सडकून टीका केली. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. ‘देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात आहे. कोरोना रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. अशी अवस्था या सरकारनं महाराष्ट्राची करून ठेवली आहे,’ असं ते म्हणाले.

‘कोरोना रोखण्याचा उपाय म्हणून कधी लॉक, कधी अनलॉक असा खेळ सुरू आहे. लॉकडाऊनसारख्या गोष्टी गरजेच्या असतात. पण ते करताना ज्यांचा रोजगार जातो, त्यांना किमान दिलासा म्हणून सरकारी तिजोरीतून दोन रुपये दिले पाहिजेत याचं भानही या सरकारला नाही. कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांत तिथल्या सरकारांनी कोरोना काळात सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मदत केली. वीज बिलं माफ केली. सवलती दिल्या. मुळात सरकार असतं कशासाठी ? अडचणीत मदत करण्यासाठी. मात्र, राज्यातलं ठाकरे सरकार हे सावकारांपेक्षाही भयंकर आहे,’ अशी तोफ फडणवीसांनी डागली.

वीजबिल वसुलीच्या मुद्द्यावरूनही फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवला. ‘करोना काळात राज्य सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाहीच, उलट झिजिया कराप्रमाणे विजेची वसुली केली. आता निवडणूक असल्यानं पंढरपूर, मंगळवेढ्यात विजेची कनेक्शन कापणं थांबवलंय. पण निवडणूक झाल्यानंतर १८ तारखेला पुन्हा वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात होईल. तसं नाही झालं तर माझं नावच बदलून टाकेन,’ असा शब्दही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *