Fri. Oct 7th, 2022

देवेंद्र फडणवीसांनी उतावीळ मंत्र्यांना फटकारले

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्राच्या योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ट करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारमध्ये विचारमंथन सुरू आहे. याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच ही ‘गोपनीय बातमी’ प्रसारमाध्यमांमध्ये फुटली. त्यामुळे नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. मुख्यमंत्र्यांनीही सत्तार यांना खडसावले आहे.

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून काही मंत्री परस्पर माध्यमांमध्ये घोषणा करत आहेत. त्या घोषणा पूर्ण न झाल्यास अडचण होऊ शकते, हे लक्षात घेऊन फडणवीस यांनी मंत्र्यांना वठणीवर आणले आहे. शेतकरी कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशी योजना राबवायची की केंद्र सरकारच्या योजनेत राज्याचा वाटा मिसळून ती मदत शेतकऱ्यांना द्यायची, याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे अधिकारी आणि सचिवांशी बोलणी करत आहेत.

कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली, असा जाबच देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारला. एकाकी विचारणा झाल्याने काय बोलावे ते त्यांना कळेना. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना खडसावले. आपण निर्णय झाल्याचे जाहीर केले नाही, त्याबाबत विचार सुरू आहे, असे सांगितल्याचे उत्तर सत्तारांनी दिले. मात्र, त्यावर फडणवीसांचे समाधान झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.