धुळ्यातील महिला रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने परराज्यात हलवले

एकीकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे धुळे जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी येत असतानाच दुसरीकडे त्याच्या पूर्वसंध्येला एका महिला रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने परराज्यात हलवावे लागण्याची घटना घडली आहे. साक्री रोडवरील एका खाजगी रुग्णालयात एका महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र त्रास होत असल्याने तिला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत होती.

धुळे जिल्ह्यासह मालेगाव नाशिक पारोळा नंदुरबार या ठिकाणी व्हेंटिलेटरची व्यवस्था होईल का याची चौकशी केली असता व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत अखेर या महिलेला मध्यप्रदेशातील भोपाळ येथे उपचारार्थ पाठवण्यात आले. भोपाळ येथील रुग्णालयात सायंकाळी व्हेंटिलेटर उपलब्ध करून रात्री तिला उपचारार्थ रवाना करण्यात आले.

सकाळपासून साधारण सात ते आठ तासांपासून व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नसल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून अखेर परराज्यात या महिलेला उपचारार्थ पाठविण्यात आले.

Exit mobile version