Wed. Aug 4th, 2021

गर्भावस्था आणि मधुमेह यांबाबत घेतली पाहिजे ही काळजी

मधुमेही स्त्रियांचे गरोदरपणही निरोगी राहू शकते. गरोदर राहण्यासाठी नियोजन करण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी सामान्य श्रेणीच्या जवळ राखणे खूपच महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी अधिक असेल तर गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्यापासून बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही गरोदर आहात हे तुम्हाला कळण्यापूर्वीही गर्भावर मधुमेहाचे परिणाम होऊ शकतात. तुम्हाला मधुमेह असेल आणि आता तुम्ही गरोदर असाल, तर तत्काळ डॉक्टरांना भेटून मधुमेहाच्या व्यवस्थापनाचे नियोजन करून घ्या. तुमच्या डॉक्टरांसोबत यावर काम करत राहिल्यामुळे आणि त्यांनी मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी दिलेल्या योजनेचे अनुकरण करत राहिलात, तर प्रसुतीपर्यंत निरोगी गरोदरपण अनुभवण्यात तुम्हाला नक्कीच मदत होईल.

पूर्वीपासून अस्तित्वात असलेला मधुमेह आणि गर्भावस्था

गर्भारावस्थेत होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. गरोदर राहण्यापूर्वी मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी अमलात आणल्या जाणाऱ्या योजनेमध्ये डॉक्टरांशी चर्चा करून बदल करणे आवश्यक ठरते. अगदी होणाऱ्या मातेला गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेह असला, तरी त्यांना आहाराची योजना, शारीरिक व्यायामाचा दिनक्रम आणि औषधांमध्ये गरोदरपणात बदल करावा लागतो. प्रसुतीची तारीख जवळ येऊ लागली असताना व्यवस्थापन योजनेत काही बदल करावे लागू शकतात.

डॉ. जयदीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मधुमेहाच्या सर्व रुग्णांनी गरोदरपणात फंडोस्कोपी (नेत्र विस्तार तपासणी) करून घेणे आवश्यक आहे, कारण, मातेच्या रेटिनामध्ये पूर्वीपासून समस्या असेल, तर गरोदरपणात ती अधिक तीव्र होऊ शकते. त्याचप्रमाणे होणाऱ्या मातेने ग्लायसेमिक नियंत्रण काटेकोर ठेवणे अत्यावश्यक आहे. ग्लायसेमिक नियंत्रण निकृष्ट दर्जाचे असेल तर त्यामुळे निओनेटल हायपोग्लासिमिया होऊ शकतो.

मधुमेहामुळे गरोदरपणात येऊ शकणाऱ्या आरोग्यविषयक समस्या

मधुमेहामुळे होणाऱ्या मूत्रपिंड आणि डोळ्यांशी संबंधित काही दीर्घकालीन समस्या गरोदरपणात अधिक तीव्र स्वरूप धारण करू शकतात. गरोदर स्त्रीचा रक्तदाब वाढला किंवा गरोदरपणाच्या दुसऱ्या टप्प्यात लघवीतून मोठ्या प्रमाणात प्रथिने जाऊ लागली तर प्रीक्लॅम्पसिया होण्याची शक्यता असते.

मधुमेहाचे बाळावर होणारे परिणाम

रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असेल, तर त्याचे बाळाच्या विकासावर अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून परिणाम होऊ शकतात. अगदी पहिल्या आठ आठवड्यांतही बाळावर परिणाम होतात. यामुळे हृदयामध्ये कॉनजेनिटल विकलांगता येऊ शकते किंवा मज्जारज्जू व मेंदूमध्ये दोष निर्माण होऊ शकतात. यामुळे दिवस पूर्ण होण्यापूर्वी बाळाच्या जन्माची शक्यता वाढते, बाळाचे वजन बरेच वाढते, त्याला जन्मल्यानंतर श्वसनात समस्या येऊ शकतात किंवा त्याच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी खालावू शकते.

मधुमेहासह गरोदरपणासाठी सज्ज होणे

पहिली आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे गर्भधारणेपूर्वी आणि गरोदरपणात रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य श्रेणीच्या शक्य तेवढी जवळ राखा.गर्भधारणेपूर्वी किंवा तुम्ही गरोदर आहात हे कळल्यानंतर तत्काळ संपूर्ण वैद्यकीय तपासणी करवून घ्या. उच्च रक्तदाब, नेत्रविकार, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार, मज्जासंस्थेतील बिघाड, मूत्रपिंडांचे विकार आणि थायरॉइडच्या समस्या आदींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

गर्भधारणेपूर्वी, गरोदरपणात आणि प्रसुतीनंतर वजन निरोगी राखण्यासाठी सुयोग्य आहार योजनेचे पालन करा. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे उपयुक्त ठरते. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टरॉलची पातळीही निरोगी श्रेणीत राखण्यात, तणाव दूर ठेवण्यात, हृदय व हाडे सशक्त राखण्यात, स्नायूंचे बळ सुधारण्यात व सांधे लवचिक ठेवण्यात मदत होते. आठवड्यातील पाच दिवस दररोज किमान ३० मिनिटे व्यायामाचे उद्दिष्ट ठेवा.
तुम्ही औषधे घेत असाल, तर तुमच्या डॉक्टरांना त्याची माहिती देणे अत्यावश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *