Jaimaharashtra news

किडनीचा डायबिटीसपासून बचाव कसा कराल…

आपण म्हणू शकतो की, किडनी म्हणजे मूत्रपिंडे ही शरीराची फिल्टर अर्थात गाळणी आहे. ही लहान स्वरुपाची मल व्यवस्थापन करणारी दुहेरी यंत्रणा आहे. जी रक्तातील अशुद्धी दूर करते. डायबिटीसमुळे किडनीला हानी पोहोचू शकते. तिचे तंत्र बिघडण्याची शक्यता असते. याबाबतीत दुर्लक्ष झाल्यास किडनी फेल होण्याचा धोका देखील उदभवू शकतो.

डायबिटीस किडनीकरिता कशाप्रकारे हानिकारक आहे?

डायबिटीस असल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे किडनीला रक्त गाळण्याकरिता अधिक कष्ट घ्यावे लागतात. परीणामी, लघवीत थोड्या प्रमाणात प्रोटीन (प्रथिने) आढळून येते. किडनीचे कार्य बिघडल्यास लघवीत मोठ्या प्रमाणावर प्रोटीनचे प्रमाण वाढते; जेणेकरून किडन्यांचे कार्य शिथील होऊन त्या निकामी होतात.

किडनीचा बचाव करण्याचे मार्ग

जेव्हा एखादी व्यक्ती डायबिटीसग्रस्त होते, त्यावेळी कोणत्याही अन्य विकाराप्रमाणे ‘प्रतिबंध हा उपचारापेक्षा बरा’ ही म्हण लागू पडते. किडनीची हानी होऊ नये यासाठी बचावाचे काही मार्ग उपयोगी ठरू शकतात.

1. “साखर” नियंत्रणात ठेवा आणि रक्तदाब आटोक्यात असू द्या:
जर एखाद्या व्यक्तीत डायबिटीस 2 चे निदान झाले तर डॉ. जयंत केळवडे, यांच्यानुसार विशिष्ट प्रमाणात साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रणात राखावा. समतोल आहार घ्यावा, व्यायाम करावा. त्यासाठी नियमित रक्तातील साखर आणि बीपी तपासून पहावे, योग्य ती औषधे घेऊन काळजी घ्यावी आणि व्यायाम करावा.

2. आरोग्यदायी आहार घ्या आणि क्रियाशील रहा
आपल्या नियमित आहारात साखर/ उष्मांक आणि मीठ जास्त प्रमाणात नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच व्यायाम, चालणे, सायकल चालवणे, पोहणे, जॉगिंग आणि नृत्य यासारखे पर्याय उपयुक्त ठरतात. नियमितपणे 30 मिनिटांच्या व्यायामाने बराच फरक पडतो.

3. धूम्रपान टाळा

धूम्रपानामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे कठीण होते, रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे किडनीचे कार्य मंदावून अवयवांना कमी प्रमाणात रक्त पोहोचते.
4. नियमित औषधांचे सेवन करा
जरी रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रित झाले, तरीही नियमित औषधे घेणे महत्त्वाचे ठरते. ज्यामुळे “निश्चित उद्दिष्टानुरूप” साखरेचे प्रमाण राखायला मदत होते.
डायबिटीसग्रस्त लोकांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखल्यास किडनी विकाराला अटकाव होऊ शकतो. तुमच्या किडन्या आरोग्यदायी राखण्याकरिता डॉक्टरांनी सुचविलेला आहार आणि औषधे याचे काटेकोर पालन करा.

Exit mobile version