Thu. Apr 22nd, 2021

अशी होते साजरी गोव्यामध्ये दिवाळी!

दिवाळी हा सण प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसंच प्रत्येक ठिकाणी सणांचं काहीतरी वेगळपण असतंच. अशाच प्रकारे दिवाळीचा सण हा गोव्यात वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रात्री नरकासुराच्या भव्य प्रतिमा केल्या जातात. त्याच्या स्पर्धा भरवल्या जातात या प्रतिमांचं पहाटे दहन केल्यावर गोव्यामध्ये दिवाळी सणाला प्रारंभ होतो.

गोव्यात दिवाळीचा दिवस म्हणजे ‘नरक चतुर्दशी’ या दिवशी नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन हा मोठ्या आकर्षणाचा भाग आहे. दिवाळीत याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे.

 

नरकासुर दहनाचा इतिहास

गोव्यातील संस्कृती आणि संदर्भ बघता या दिवशी मोठ्या अक्राळविक्राळ नरकासुराचं दहन करण्याची प्रथा आणि इतिहास फार जुना नाही. प्रतिमांच्या दहनाची परंपरा गोवा मुक्ती संग्रामानंतर प्रचलित होऊन अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गोवा अगदी पूर्वीपासून शेतीप्रधान राज्य… याच काळात भाताचं पीक तयार झालेलं असतं. शेतातील कामं संपलेली असतात. त्यामुळे शेतातून भाताचं पीक काढून झालं की उरणारं तण नरकासूर बनवायला वापरलं जायचं. मग कालांतराने शेतातील तण, घराच्या आजूबाजूचं गवत, सुका पालापाचोळा यापासून नरकासुराचा पुतळा तयार करू लागले.

यातूनच सध्या प्रचलित असलेलं महाकाय नरकासुराचं रूप तयार झालं. गोव्यातील तरुण मुलं हातातली सगळी काम संपवून दिवाळीच्या काही दिवसांआधीच कागदाचे नरकासूर बनवण्यात दंग असतात. त्यासाठी आजूबाजूच्या घरांतून रद्दीतली वर्तमानपत्रं आणि कागद गोळा केली जातात.

 

 

नरकासुरासाठी स्पॉन्सरर्स

युवा पिढीवर नरकासूर बनवण्याचा वाढता प्रभाव बघून अनेक राजकीय नेतेसुद्धा आता त्यांना आर्थिक सहाय्य देऊ लागले आहेत. त्यामुळे नरकासुरांची संख्या वाढू लागली आहे. मात्र सध्याच्या नरकासूर दहनाविषयी अनेकांचं नकारात्मक मत आहे. नरकासुराच्या निमित्ताने होणारी पैशांची उधळण, दारूचा पुरवठा आणि डीजेमुळे आलेलं विकृत रूप या सगळ्यानं युवा पिढी बिघडत आहे, असं अनेकांना वाटतं.

हे महाकाय दिसणारे नरकासुर कागदाचे बनवले जातात. त्यासाठी आजूबाजूच्या घरातून रद्दीतले वर्तमानपत्र, कागद गोळा केले जातात.

‘गोव्यातील नरकासूर दहनात निसर्ग स्वच्छ राखला जावा, असा एकेकाळी असलेला उद्देश आता काळाच्या ओघात हरवू लागला आहे. नरकासुराच्या निमित्ताने कचऱ्यात अधिक भर पडते. राजकीय पुढारी या पिढीला हाताशी धरू पाहत आहेत.’ असा आरोपही याबाबत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *