Wed. Jun 29th, 2022

मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मुंबईत भेट झाली. भोंग्याच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाली असून सर्व धार्मिक स्थळांना भोंगा लावण्यासाठी परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. परवानगी आवश्यक करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला असून, आता या निर्णयावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, भोंग्याच्या मुद्द्यावर पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना एकत्रित धोरण ठरवण्याचे आदेश दिले आहेत.

भोंग्यावरुन राज्यभरात वातावरण तापलं असताना राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात कायदा आणि  सुव्यवस्था कायम राहावी यासाठी, गृहखात्याने सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची बैठक झाली असून त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले आहे.

काय आहे भोंगा प्रकरण ?

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे बंद झाले नाही तर मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भोंगा प्रकरण चांगलेच तापले आहे. तसेच यानंतर ठाण्यात मनसेची उत्तरसभा पार पडली असून त्या सभेत ही राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसेच, राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा भोंगा उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी राजकीय वर्तुळात तसेच विविध सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.