मधुमेहाचा मौखिक आरोग्यावरील परिणाम

मधुमेहामुळे तुमच्या मौखिक आरोग्यालाही धोका पोहोचू शकतो हे तुम्हाला माहीत होते का? मधुमेहाचा परिणाम दृष्टी, हृदय आणि मज्जातंतूंवर होतो, त्याचप्रमाणे अनेक मौखिक आरोग्य समस्यांचा संबंधही मधुमेहाशी आहे.
हे कसे होते? मधुमेह आणि मौखिक आरोग्याच्या समस्यांमधील प्रमुख दुवा म्हणजे रक्तातील साखरेचे उच्च प्रमाण होय. रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित नियंत्रित नसेल, तर मौखिक आजार होण्याची शक्यता वाढते.
यामागील विज्ञान समजून घेऊ डॉ. हर्षल एकतपुरे यांच्यानुसार मुखात होणाऱ्या जीवाणूजन्य प्रादुर्भावांविरोधात शरीराची बचाव यंत्रणा असलेल्या श्वेत रक्तपेशींना (डब्ल्यूबीसी) मधुमेह कमकुवत करतो. म्हणूनच मधुमेहाशी संबंधित गुंतागुंती होऊ नयेत यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखणे निर्णायक आहे.

मधुमेहाशी संबंधित मौखिक आरोग्य समस्या

पेरिओडोण्टल किंवा हिरड्यांच्या आजाराकडे अलीकडे सर्वाधिक लक्ष दिले जात आहे. पेरिडॉण्टल आजारामुळे वेदना व दुर्गंधी निर्माण होते व ही लक्षणे दीर्घकाळ टिकतात. यामुळे अन्न चघळणे कठीण होते व दात गमावण्याचीही शक्यता असते.
ड्राय माउथ अर्थात मुख शुष्क पडण्याची समस्या मधुमेह अनियंत्रित झाल्यामुळे तोंडातील लाळेचे प्रमाण घटून निर्माण होते. परिणामी अस्वस्थता, अल्सर्स, प्रादुर्भाव आणि दात किडण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
लाळेतील साखरेचे उच्च प्रमाण, शुष्क मुख आणि शरीराची कमकुवत झालेली बचाव यंत्रणा यांची परिणती ओरल थ्रशमध्ये होते. ओरल थ्रश हा एक बुरशीजन्य प्रादुर्भाव आहे. यामध्ये वेदनादायी पांढरे चट्टे येतात आणि पुढे यामुळे तोंडात किंवा जिभेवर जळजळ जाणवू लागते. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये थ्रश आणि पेरिडोण्टल आजार होण्याची शक्यता धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत २० पट अधिक असते. हिरड्यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्येही धूम्रपानामुळे अडथळे निर्माण होतात.

मौखिक आरोग्याच्या समस्यांना प्रतिबंध करण्याचे मार्ग

मौखिक आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच ते टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखणे निर्णायक आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण नसलेल्यांना हिरड्यांचे आजार अधिक वारंवार होतात तसेच मधुमेहावर उत्तम नियंत्रण असलेल्यांच्या तुलनेत या रुग्णांमध्ये आजारांचे स्वरूपही तीव्र असते.

मधुमेहाशी संबंधित मौखिक आरोग्याच्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी खालील चांगल्या सवयी लावून घ्या:

* तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखा.
* तुमच्यावर उपचार करणाऱ्या डेंटिस्टना मधुमेहाची माहिती द्यायला विसरू नका.
* दाताच्या कामांसाठी जेव्हा जेव्हा डेंटिस्ट क्लिनिकमध्ये जाल, तेव्हा तेव्हा मधुमेहाची सद्यपरिस्थिती डेंटिस्टना सांगा.
* दात आणि हिरड्या वर्षातून किमान दोनदा तपासून व स्वच्छ करून घेतल्या पाहिजेत.
* दिवसातून दोनदा ब्रश करा आणि वरचेवर फ्लॉस करा.
* तुम्ही कवळी वापरत असाल, तर ती दररोज बाहेर काढून स्वच्छ करा.
* धोका कमी करण्यासाठी धूम्रपान टाळा.
* मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने, मौखिक आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घेणे आणि मौखिक आरोग्यातील कोणत्याही बदलाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Exit mobile version