ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध दिघे संघर्ष

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले असून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी नव्याने केदार दिघे यांना सोपवण्यात आली आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असून आता ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध दिघे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेना ही संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही. तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांनी शिवसेना वाढवली. मला जिल्हाप्रमुखपद दिलंय त्यातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचं काम मी करणार आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही अशा शब्दात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुनावलं आहे.
बाळासाहेबांमुळे आणि आनंद दिघेंमुळे शिवसेना ठाण्यात उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळे ही शिवसेना घडली आहे. कुणाचा फोटो झाकून न झाको शिवसैनिक विचारांवर ठाम आहे. शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी आनंद दिघे यांच्यासोबत जे काही घडले त्याचा साक्षीदार मी आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यावेळी केदार दिघेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले. केदार दिघे म्हणाले होते की, आनंद दिघेंबाबत जे घडलं ते माहित होतं तर मग इतके वर्ष गप्प का होता? असा सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?” असं केदार दिघेंनी म्हटलं होते.