Jaimaharashtra news

माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा, आणिक मी देवा काही नेणे… एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेनं चालत आहेत. पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार आहे.

 

सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट ओलांडतील. पाऊसपाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवे घाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो. नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात. पण माऊलींच्या साथीनं हा अवघड टप्पाही वारकरी सहज पार करतात.

 

टाळ मृदंगाच्या गजरानं अवघा दिवे घाट दुमदुमून जातो. विठ्ठल भक्तीच्या जोरावर दोन तासांमध्ये वारकरी हा टप्पा पार करतात. दुपारी अडीच वाजता दिवेघाट चढायला सुरुवात झाली की साडेचारच्या सुमारास हा टप्पा पार केला जातो. माऊलींच्या पालखीआधीही अनेक वारकरी हा दिवेघाट ओलांडताना दिसतात.

Exit mobile version