Fri. May 7th, 2021

डोंबिवलीकर पुन्हा एकदा वायूप्रदूषणाने हैराण

डोंबिवली : प्रदूषणाची नगरी म्हणून डोंबिवलीची ओळख निर्माण होत आहे. डोंबिवलीत पुन्हा एकदा गॅसच्या उग्र वासामुळे डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरला. वारंवार होणाऱ्या या त्रासाने डोंबिवलीकर अक्षरशः हैराण झालेत.

डोंबिवलीतील पूर्व, पश्चिम, ठाकुर्ली आणि परिसरात कालपासून कुजट वास पसरला होता. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हा वास डोंबिवलीतील खंबाळपाडा एमआयडीसी भागातून गॅस उत्सर्जित केल्याने येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डोंबिवलीत आणि विशेषतः खंबाळपाडा परिसरात याआधी केमिकलचं सांडपाणी नाल्यात सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण झालेलं. त्यानंतरही असे प्रकार सुरूच आहे. तसेच यासर्व प्रकरणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेचा आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सर्व प्रकरणाबाबात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कल्याणमधील प्रदूषण नियंत्रण मंडळ डोंबिवली एमआयडीसीत स्थलांतरित करण्यात यावं, अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाडांनी केली आहे. तसेच या प्रदुषणाचा विषय नागपुरातील हिवाळी अधिवेशनात उचलणार असल्याचेही गणपत गायकवाड यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *