माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका, प्रियंका गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला!

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा  ठेवू नका असे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मतदारसंघात जाऊन काम करा असा सल्ला दिला.

छोट्यातल्या छोट्या गटापर्यंत पक्षाचे काम कसे पोहचेल यावर सर्व निकाल अवलंबुन असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी प्रियंका गांधींनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून हाकलून बाहेर काढण्यात येईल असा इशाराही दिला आहे.

बैठकीदरम्यान प्रियंका गांधी यांनी मतदारसंघांमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे याची चाचपणी केली.

प्रियंका गांधी यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशातील 41 जागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यामध्ये वाराणसी, गोरखपूर, फैजाबाद, फुलपूर आणि झांसी सारख्या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे.

याशिवाय राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि सोनिया गांधींच्या रायबरेलीचाही समावेश आहे.

प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे.

‘मी या पदावर बसून कोणताही चमत्कार करु शकत नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीच पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे.

राज्यात पक्षाला बळ मिळावे यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे’, असे यावेळी प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version