Thu. Nov 26th, 2020

‘शरद पवार यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका’, वारकरी परिषदेचं पत्रक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर राष्ट्रीय वारकरी परिषदेने गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. शरद पवार हिंदू विरोधी आहेत, त्यामुळे त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेने जाहीर केलंय.

काय आरोप केले आहेत पवारांवर?

शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलवू नका, असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेनं जारी केलं आहे.

पवार रामायणाची गरज नसल्याचं विधान करतात. (Sharad Pawar’s statement about Ramayana)

संत स्वामी रामदास यांचा एकेरी उल्लेख करतात.  (Sharad Pawar on Saint Ramdas Swami)

पुस्तकांतून हिंदू देव आणि धर्म, संत यांचा अपमान करणाऱ्या संघटनांचं समर्थन करतात.

संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलीच नाही, संत तुकाराम वैकुंठी गेले नाहीत असं पसरवणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना ते कायम पाठिंबा देतात.

ते मुख्यमंत्री असतानाही पांडुरंगाच्या महापुजेला गैरहजर राहत.

अशा नास्तिक व्यक्तीला आमंत्रित करून, त्यांची व्याख्यानं आयोजित करून पांडुरंगाची अवकृपा ओढावून घेऊ नका, असं पत्रकात म्हटलंय. अशी माणसं धार्मिक कार्यक्रमाला बोलावणं हा अधर्मच असल्याचंही पत्रकात लिहिलंय.

पूर्वीचे राज्यकर्ते देवाधर्मावर श्रद्धा बाळगणारे होते. मात्र जे स्वतः देव मानत नाही, त्यांना आपण का मानायचं असा सवालही पत्रकात केलाय.

पत्रक कुणी पाठवलं?

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक आणि अध्यक्ष निवृत्ती महाराज हे आहेत त्यांनी मात्र या पत्रकाबद्दल आपल्याला काही माहीत नसल्याचं म्हणत हात वर केले आहेत. तसंच कार्यवाह बापू महाराज रावकर यांनी हे पत्रक पाठवलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या पत्रकामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *