‘ड्रीम गर्ल’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
“ड्रीम गर्ल” हे चित्रटाचे नाव असून त्यात आयुषमान खुराना वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुषमान खुराना याचा आता स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झालाय. आयुषमानचे सिनेमे म्हणजे नक्कीच हटके विषय असणार, अशी प्रेक्षकांना खात्री असते. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘शुंभमंगल सावधान’, ‘बधाई हो’, ‘बरेली की बर्फी’ यांसारख्या वेगळ्या बाजाच्या सिनेमांनंतर आता त्याचा ड्रिम गर्ल हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडला आहे.
काय आहे कथा?
छोट्याशा शहरात राहणारा कर्मवीर (आयुषमान खुराना) लहानपणापासून मुलींचे आवाज काढण्यात पटाईत असतो. बेरोजगारीने त्रासलेल्या कर्मवीरला नाटकामध्ये राधा किंवा सीता याची भूमिका साकारायला मिळत असते. त्यातूनच पुढे एका कॉल सेंटरमध्ये मुलीच्या आवाजात संवाद साधायची नोकरी त्याला मिळते. कॉल सेंटरमध्येही ‘पूजा’ या नावाखाली तो मुलीच्या आवाजात लोकांशी संपर्क साधत असतो. हळुहळू पूजा आवाजाच्या जोरावर शहरात प्रसिद्ध होऊ लागते. न पाहिलेल्या पूजाच्या प्रेमात अनेक जण वेडे होतात आणि याचा कर्मवीरला किती त्रास होतो, त्यातून तो कसा मार्ग काढतो, याचा गमतीदार प्रवास म्हणजे ‘ड्रीम गर्ल’…
मनोरंजक
दिग्दर्शक म्हणून राज शांडिल्य यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच प्रयत्नात मनोरंजनाची भट्टी चांगलीच जमली आहे. वेगळ विषय आणि तगड्या कलाकारांची फौज यांमुळे सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय. अन्नू कपूर, मनज्योत सिंग यांसारख्या अभिनेत्यांचं कामही धमाल आहे. आयुषमानने यावेळीही प्रेक्षकांना निराश केलेलं नाही. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये गर्दी खेचतोय.