Mon. Jan 17th, 2022

देशी गायीची दूधगंगा

विदर्भातील शेतकऱ्यांना जोडधंदा दिल्याशिवाय विदर्भातील शेती फायद्याची ठरू शकणार नाही असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला असला तरी त्याची योग्य अंमलबजावणी अभावी विदर्भातील शेतकरी आत्महत्येचा आकडा हा कधी कायम राहिला तर कधी वाढला. विदर्भाच्या शेतीचा विचार केला तर गाय, बैल, शेळी आणि कोंबड्या हे प्राणी शेतकऱ्यांना मदतीचे आणि आर्थिक फायद्याचे ठरतात त्यातही देशात मोजक्याच ठिकाणी आढळणारी गौळावू गाय नागपूर आणि वर्धा जिल्हयात मोठ्या प्रमाणात आढळते, मात्र तीच योग्य पद्धतीने संवर्धन न झाल्याने ह्या गाई क्रॉस होत गेल्या, त्यामुळे शुद्ध गौळावू गाई देखील तीन आकडी संख्येमध्ये आल्या, श्री कृष्णाने रुक्मिणी हरण करताना आपल्या सैन्यासोबत गोकुळातून या गाई सोबत आणल्या होत्या अस मानलं जातं कृष्ण रुक्मिणी ला घेऊन परत गेला पण या गाईंनी विदर्भाला आपलं केलं.

विदर्भात माफसू म्हणजे महाराष्ट्र पशु वैद्यकीय विद्यापीठ, डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ सारख्या संस्था आहे, असे असताना देखील या भागात पशुधन वाढला नाही त्यातही दुधाचे उत्पादन देखील वाढले नाही. भंडारा जिल्हा सोडला तर इतर जिल्ह्यात त्या जिल्ह्याला पुरेल इतकं दूध उत्पादन आजही होत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या दोन्ही संस्था ज्यावर शासनाचा कोट्यवधी रुपये वार्षिक खर्च होतो ह्या फक्त पांढरा हत्ती ठरल्या आहेत..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शेती विषयाला घेऊन आग्रही आहे त्यातही दुधाच उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक सुदृढ करणं हे स्वप्न असल्याचं गडकरी यांनी अनेक जाहीर कार्यक्रमातून सांगितलं. मात्र अधिकारी गडकरींना गंभीर्याने घेत नाही का? असा प्रश्न उभा राहतो कारण दोन वेळा माफसू च्या कुलगुरू समोरच गडकरी यांनी विदर्भात दुधाचे उत्पादन वाढले नाही तर कारवाई करण्याची तंबी दिली. नितीन गडकरींच्या संकल्पनेतून नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या ऍग्रोव्हिजनमध्ये पुन्हा याचा प्रत्यय आला गडकरींनी थेट दुधासाठी स्वत: आंदोलन करणार असल्याची थेट धमकी वजा इशारा अधिकाऱ्यांना दिला. तुमचे इथले अधिकारी काहीही काम करत नाही. दुध उत्पादन वाढविण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नाहीयेत. राज्य सरकारने दिलेला पैसादेखील खर्च होत नसल्याचे चित्र आहे. तीन लाख लिटरच्यावर दुग्धउत्पादन गेलेले नाही. हे असेच सुरू राहीले तर मी स्वत: आंदोलन करील’, असा सज्जड दम गडकरी यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीबीबी) आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांना दिला. मी जे म्हणतोय त्याची गंभीर दखल न घेतल्यास येत्या दोन महिन्यांत दिल्लीला कॅबिनेट मंत्र्यासोबत बैठक लावून तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडील हे सांगायला देखील गडकरी विसरले नाही. विदर्भातील दुध उत्पादन तीन लाख लिटरहून तीस लाख लिटरपर्यंत पोहचविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाने वीस लिटर दूध देऊ शकणारी गाय शक्य आहे. यामध्ये प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

आज देशात दुधाच्या आवश्यकतेच्या निम्मं उत्पादन घेतल जातं. त्यामुळे दुधाचा व्यवसाय विदर्भातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. फक्त गरज आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याची आणि हे प्रत्यक्षात घडलं तर विदर्भातील शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.  सोबत बकरी पालन कुकुट पालन या व्यवसायात देखील शेतकऱ्यांना मदत मिळली तर शेती सोबत जोड धंदा मिळाल्याने शेतीवरची अवलंबिता कमी होऊन पुन्हा एकदा विदर्भातील शेतकरी सुखी संपन्न होऊ शकतो.

विदर्भातील तरुण शेतकरी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहे, IVF तंत्रज्ञानाचा वापर करून दूध उत्पादन वाढवीत आहे. मात्र गरज आहे त्यांना दत्तक घेऊन मदत करण्याची एका बाजूने रोज होणारी अवैद्य गोवंश हत्या आणि दुसऱ्या बाजूने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब न करण्याची भूमिका यामुळें विदर्भातील गाईंचं अस्तित्व भविष्यात धोक्यात आनेलच पण विदर्भातील शेतकऱ्यांना देखील जोड व्यवसाय मिळणार नाही.

– उदय तिमांडे, नागपूर

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *