विहिरीत पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू

बिबट्याचा विहिरीत पडून नाहक जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकतीच पुण्यातील अशीच एक घटना समोर आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे शंकर शिवले या शेतकऱ्याच्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरात या बिबट्याची दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार समोर आला आहे.
वन विभागाला याबाबतची माहिती देऊनही वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मृत बिबट्या हा मादी प्रजातीचा असून त्याचे वय दोन ते अडीच वर्ष असावे असे वनविभागाने सांगितले आहे. बिबट्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी माणिकडोह येथे पाठवण्यात आला आहे.