Mon. Aug 8th, 2022

मंगळवारी दुसऱ्यांदा सोनिया गांधींची ईडी चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी मंगळवारी सोनिया गांधींना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यानुसार सोनिय़ा गांधी ईडी कार्यालयात उपस्थित राहिल्या आहेत. ही चौकशी आज संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. ईडीकडून आज सोनिया गांधी यांना जवळपास ३६ प्रश्न विचारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोनिया गांधी यांच्यासह चौकशी दरम्यान प्रियंका गांधी-वाड्रादेखील उपस्थित राहिल्या आहेत. याविरोधात काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीत संसदेच्या बाहेर आणि आतमध्ये आंदोलन करण्यात येईल. मुंबईत मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे . पुणे, वाशिममध्येही आंदोलन होणार आहे. यापूर्वी ईडीनं गुरुवारी २१ जुलै सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण, पुन्हा नव्यानं समन्स बजावत २५ ऐवजी २६ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. तारीख बदलण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होते. पण, त्यावेळी कोरोनाची लागण झाल्यानं त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. कोरोनामुक्त झाल्यानंतर सोनिया गांधी ईडी चौकशीला उपस्थित राहिल्या. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत पुत्र राहुल गांधी आणि कन्या प्रियांका गांधी वाड्राही उपस्थित होत्या. सोनिया गांधी यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेऊन ईडीनं प्रियांका गांधी यांना विशेष सूट म्हणून ईडी कार्यालयातील चौकशी कक्षापासून दूर आईसोबत जाण्याची परवानगी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.