Wed. Jul 28th, 2021

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर गृहमंत्रिपदाचा राजीनामा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणखी अडचणीत आले आहेत. सक्तवसुली संचालनालयानं देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. या आरोपांचा पुरावा म्हणून परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे पुरावेही दिले होते.पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल केला आहे.

या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. तसंच सीबीआयला कठोर कारवाई करण्यापासून मज्जाव करण्याचीही मागणी केली आहे. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *