Wed. Dec 8th, 2021

देशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ई़डीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. मात्र अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत,अशी माहिती मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहिलं असून तक्रारीची प्रत अद्याप मिळाली नाही नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पलांडे यांची ईडीने चौकशी करुन त्यांना अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांना ईडीने समन्स बजावला होता. पण प्रकृतीचे आणि कोरोनाचे कारण सांगून ही चौकशी ऑनलाईन व्हावी अशी मागणी अनिल देशमुखांनी केली होती.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा १०० कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंद केला होता.

अनिल देशमुखांनंतर ईडीने ऋषिकेश देशमुखांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. वसुली प्रकरणातील चौकशीपासून आपल्याला दिलासा मिळावा म्हणून अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून या आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *