वानखेडेवर गोलंदाज एजाझ पटेलचा विश्वविक्रम

भारत आणि न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेलने विक्रम रचला आहे. एजाझ पटेलने ४७.५ षटकात १० गडी बाद करत नवा इतिहास रचला आहे. यात एजाझने १२ षटके निर्धाव टाकली, तर २.४९च्या सरासरीने ११९ धावा दिल्या आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या संपूर्ण भारतीय संघाला एकट्या एजाझ पटेलने माघारी धाडून मोठा विक्रम रचला आहे. एजाझ पटेलने भारताचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, आर आश्विन आणि उमेश यादवला शून्यावर बाद केले. असे करत एजाझने एक-एक करत भारताच्या दहाही फलंदाजांना तंबूत पाठवले. या कामगिरीसह एजाज पटेलने अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकाच डावात १० गडी बाद करण्याचा विश्वविक्रम याआधी भारताचा अनिल कुंबळे याच्या नावावर होता आणि आत्ता तोच विक्रम न्युझीलंडच्या एजाझ पटेल याने केला आहे. हे दोन्ही खेळाडू फिरकीपटु आहेत. कुंबळे उजव्या हाताने गोलंदाजी करायचा तर अजाझ डावखुरा गोलंदाज आहे.
जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० गडी बाद करणारा एजाझ पटेल तिसरा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेने १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. एजाझने ४७.५ षटकांत ११९ धावांत १० गडी बाद केले आहेत. एजाझने १२ निर्धाव षटकेही फेकली.