Thu. May 13th, 2021

निवडणूक प्रचारामुळे नाका कामगारांना मिळतोय रोजगार

विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. त्यासाठी प्रचारकार्यात कार्यकर्त्यांबरोबरच रोजंदारी तत्वावर माणसं नेमून प्रचार करण्यावर सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार भर देत आहेत. प्रचार रॅली, सभा यासाठी माणसांची जमवाजमव आतापासूनच सुरू झाली आहे. अशा रॅलींमध्ये व प्रचारात सहभागासाठी रोजंदारी तत्वावर नाका कामगारांची बुकिंग करण्यासाठी नाका कामगारांच्या मुकादमांना आता पासूनच ऍडव्हान्स पेमेंट दिलं जातंय. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर आलेल्या ऐन मंदीच्या काळात जिल्ह्यातील नाका कामगारांना निवडणुकीमुळे काम मिळू लागलंय.

जिल्ह्यातील कल्याण, शिळफाटा, आंबेवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी तर ठाणे शहरातील कळवा नाका, कोपरी, इंदिरानगर, घोडबंदर रोड आदी भागात रोज शेकडोच्या संख्येने बिगारी काम करणारे कामगार कामाच्या प्रतीक्षेत नाक्यावर उभे असतात. या कामगारांना नाका कामगार म्हणून ओळखलं जातं.

बांधकाम क्षेत्रात बिगारी हे मुख्य काम करणाऱ्या या कामगारांना 200 ते 300 रुपये रोज मिळतात.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून आलेल्या बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे या नाका कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाले होते.

परंतु सध्या सुरू झालेल्या निवडणूक रणधुमाळीमुळे या नाका कामगारांना काम मिळू लागले आहे.

रॅली, प्रचार सभा आदी ठिकाणी गर्दी दाखवण्यासाठी अशा नाका कामगारांना मोठ्या संख्येने आणलं जात आहे.

प्रचाराच्या धामधुमीत या कामगारांना 300 ते 400  रुपये रोज आणि दोन वेळ जेवण देण्याचे आश्वासन आतापासूनच मिळू लागली आहेत.

त्यासाठी नाका कामगारांच्या मुकादमला उमेदवारांच्या खास मंडळींकडून ऍडव्हान्स पेमेंट देण्यात येत आहे.

प्रचार सभात सहभागी होण्यापासून तर प्रचाराची फलक लावण्यापर्यंतची कामे या कामगारांना मिळत आहेत.

दोन वेळचे जेवण आणि चांगला मोबदला मिळत असल्याने या कामगारांनी काही काळासाठी का होईना पण बांधकाम क्षेत्राकडे पाठ केलीय.

त्यामुळे बांधकाम क्षेत्रात आलेल्या मंदीच्या सावटाचे चटके नाका कामगारांना काही दिवस तरी जाणवणार नाही असे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *