Tue. Apr 20th, 2021

धक्कादायक! ना मीटर, ना वीज कनेक्शन; बिल मात्र 1 लाख 11 हजार 520 रुपये

शेतकऱ्यांना महावितरणकडून कसा त्रास दिला जातो याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्यातील भोडणी गावातील शेतकरी डॉक्टर संदीप कडवे शेती पंपाच्या वीज कनेक्शन मिळवण्यासाठी गेली अकरा वर्ष झगडत आहेत.

डॉक्टर संदीप कडवे यांचे बोडणी या ठिकाणी दहा एकर शेती आहे शेतीसाठी वीज कनेक्शन मिळावे यासाठी त्यांनी रीतसर महावितरणच्या कार्यालयात कोटेशन रक्कम भरली. मात्र 11 वर्षं होऊन गेली तरी देखील त्यांना विजेचं कनेक्शन मिळालेलं नाही. धक्कादायक प्रकार म्हणजे महावितरणच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला शेतात विज कनेक्शन दिलं आहे, असं म्हणत वीज मंडळाने गेल्या अकरा वर्षांपासूनचं बिल तब्बल 1 लाख 11 हजार 520 रुपये पाठवून त्यांना भरण्यास सांगितलं आहे.

डॉक्टर संदीप कवडे यांच्या शेतामध्ये वीज कनेक्शनचा अजून पत्ता नाही. मीटर नाही तरी कनेक्शन दाखवून बिलदेखील काढलं आणि तेदेखील तब्बल 1 लाख 11 हजार 520 रुपये… गावातीलच शेतकरी कार्यालयात गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथील सभेमध्ये शेतकऱ्यांनी शेती पंपाचे वीज बिल भरावे अशी आव्हान केले आहे तर दुसरीकडे महावितरण वीज नसतानाही लाखो रुपयांचे बिल शेतकऱ्यांना पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत..

याबाबत डॉक्टर संदीप कडवे यांनी महावितरणच्या कॉल सेंटरला देखील तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही ‘सिस्टीम डाऊन आहे. तक्रार घेता येणार नाही’ असं वारंवार सांगण्यात आलं. या भ्रष्टाचाराबद्दल तसंच भोंगळ कारभाराबद्दल कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

खोटी बिलं बनवून खोटी कनेक्शन्स दाखवून महामंडळाची, शेतकऱ्यांची आणि पर्यायाने सरकारची दिशाभूल केल्याबद्दल खोट्या बिलाच्या रकमेची मागणी केली जात आहे. तसंच शेतकऱ्यांना वेठीस धरून त्रास दिल्याबद्दल संबंधित प्रकरणाची आणि त्रास देण्याचा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांचे निलंबन करावं, अशी मागणी शेतकरी डॉक्टर संदीप कडवे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *