मुख्यमंत्र्यांविरोधात ह्युंडाई कंपनीच्या कामगारांचा एल्गार

कंपनीच्या त्रासाला कंटाळून ह्युंडाई कामगारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन केले आहे. वितभर पोटाच्या खळगीसह कामगारांपुढे अनेक समस्यांचे डोंगर कोसळले आहे. त्यामुळे ह्युंडाई कंपनीच्या कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ आंदोलन केले. पिंपरी-चिंचवडमधल्या या आंदोलनादरम्यान कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्यूपमेंट इंडिया प्रा. लिमिटेड चाकण पुणे, कंपनीने दहा वर्षांपासून काम करत असलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान कंपनीसुद्धा कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करत नाही तर शासन समजून घेत नाही, तसेच राज्य सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री यावर तोडगा काढत नाही. अशावेळी आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्रस्त कामगारांनी मुख्यमंत्र्यांकडे सामूहिक इच्छा मरणाची आणि सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.
तसेच कंपनीच्या त्रासाला कंटाळून उध्वस्त झालेल्या कामगारांना सामूहिक इच्छा मरणाची आत्महत्येच्या परवानगीसाठी कामगार गनिमीकावा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्रीवर धडकणार असल्याचा इशारा कामगारांचे प्रतिनिधी संदीप घाटे, शुभम मोहिते आणि यशवंत पाटील यांनी दिला आहे.